'राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात', भाजप-मनसे युतीवर बोलले बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:18 PM2022-10-17T13:18:08+5:302022-10-17T13:20:58+5:30
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली
मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. मनसेप्रमुखराज ठाकरें यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला याबाबत विनंती केली होती. त्यानंतर, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, यानंतर भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करताना भाजप-मनसे युतीवरही स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. मुरजी पटेल हे अपक्ष निवडणूक लढणार नाहीत. आम्ही निवडणूक लढलो असतो तर जिंकलोच असतो. मात्र, एक दीडवर्ष राहिले आहे, पुढील निवडणूक व्हायला. महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे व त्याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तसेच, भाजप-मनसे युतीची ही नांदी आहे का, असेही विचारण्यात आले होते. त्यावर, बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात. मात्र, भाजपचा हा निर्णय म्हणजे मनसे-भाजपच्या युतीची नांदी नाही. राज ठाकरे व शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा वेगळा भाग होता. शीर्षस्थ नेतृत्वाने हा निर्णय घेतला. अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे. आम्ही कुठलीही पळपुटी भूमिका घेतलेली नाही. २०२४ मध्ये आम्ही येथे लढू आणि जिंकू, असे बावनकुळे यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपच्या बैठका
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मेघदूत' बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीला आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋुतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे.