Raj Thackeray: कडवं हिंदुत्त्व... शनिवारच्या मांसाहारावरुन मिटकरींची राज ठाकरेंवर खोचक टिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 09:38 AM2022-04-18T09:38:53+5:302022-04-18T10:06:26+5:30
राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली. तसेच, आगामी ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याची चर्चा सुरू झाली असून राज यांच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेवरुनही चर्चा झडत आहेत. राज यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन खोचक टिका केली आहे. पुरवणी सभेत त्या बातमीचा खुलासा करावा, असेही त्यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची एक बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. राज यांनी हनुमान चालिसा म्हणण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी त्यांना हनुमान भक्त म्हणून संबोधलं आहे. त्यामुळेच, त्यांच्या हनुमान भक्तीवर शंका उपस्थित करणारी ही बातमी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, शनिवारी मटनाचं जेवण राज यांनी जेवल्याचं म्हटलंय. आता, त्यावरुन, हनुमान भक्त राज यांनी शनिवारी मांसाहार कसा केला?, असा प्रश्न विचारला जात आहे. आता, या बातमीचा खुलासा, संभाजीनगर येथील पुरवणी सभेत करावा, अशी मागणी अमोल मिटकरींनी ट्विटरवरुन केली आहे.
''राजसाहेब हिंदू धर्मामध्ये सोमवार, गुरुवार व शनिवार पवित्र दिवस मानले जातात, ज्या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो. एक जुनी बातमी वाचली, ज्यात शनिवारी आपण आपल्या आवडीचे जेवण जेवलात, त्याची आठवण म्हणून बातमी पाठवली आहे. शक्य असल्यास संभाजीनगरच्या पुरवणी सभेत खुलासा करावा. #कडवेहिंदुत्व'', असे बोचरे ट्विट मिटकरींनी केले आहे.
राजसाहेब हिंदू धर्मामध्ये सोमवार गुरुवार व शनिवार पवित्र दिवस मानल्या जातात, ज्या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो. एक जुनी बातमी वाचली, ज्यात शनि वारी आपण आपल्या आवडीचे जेवण जेवलात त्याची आठवण म्हणून बातमी पाठवली आहे. शक्य असल्यास संभाजीनगरच्या पुरवणी सभेत खुलासा करावा.#कडवेहिंदुत्वpic.twitter.com/fWzBbHZcnW
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 17, 2022
अयोध्या दौऱ्यावरुनही केली टिका
तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, मात्र श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच हनुमान चालीसाच्या दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी हे दंगली भडकविण्याचे काम करीत आहे. राज्याला फुले, शाहू यांची परंपरा आहे. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लीम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे, असं अमोल मिटकरी यांनी यावेळी सांगितलं.
मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.
...तर आमचेही हात बांधले नाहीत- राज ठाकरे
मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.