मुंबई-
राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न तापलेला असताना या मुद्द्यावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाठ फिरवली आहे. भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. पण या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती लावलेली नाही. त्यांच्याजागी मनसेचे बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित राहीले आहेत. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते अशी माहिती समोर आली होती. पण त्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
देवेंद्र फडणवीस सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली असून ते स्वत: तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपा प्रदेशकार्यालयात दुपारी १ वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
फडणवीसांपाठोपाठ एमआयएमचे इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर देखील अनुपस्थितीत राहीले आहेत. राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या वादावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रसारमाध्यमांना बैठकी संदर्भातील माहिती देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.