Join us

लक्ष ठेवा...उपरे रेल्वे भरतीत घुसणार नाहीत; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:53 PM

रेल्वे भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मुंबई - आगामी काळात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. या रेल्वे भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रातील मुला-मुलींनाच नोकरी मिळेल आणि या भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. यंदाचा वर्षी रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली होती. 

राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत रेल्वे भरतीवर भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, रेल्वे भरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००८ साली एक मोठं आंदोलन उभारलं होतं. त्या आंदोलनाचा परिणाम असा की पुढे रेल्वे भरतीच्या परीक्षांच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात येऊ लागल्या, आणि त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत परीक्षा देणं आणि नोकरीत निवड होण्यासाठी स्थानिक भाषा येणं सक्तीचं केलं गेलं. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा विजय होता असं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

 

आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती आहे. ह्या रेल्वे भरतीचा फायदा माझ्या मराठी तरुण-तरुणींनी घ्यायलाच हवा. पण त्यासाठी फॉर्म कसा भरावा, तयारी कशी करावी ह्याचं मार्गदर्शन पण त्यांना व्हायला हवं. ह्याच उद्देशाने माझे पक्षातील सहकारी अभिजित पानसे ह्यांनी एका तज्ज्ञांची मुलाखत घेतली आहे ती मुलाखत पाहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी युवकांना केलं आहे. ही २० मिनिटाची मुलाखत शांतपणे ऐका. त्यात सांगितल्याप्रमाणे तयारी करा, अर्ज भरा. झटून अभ्यास करा, यश नक्की मिळेल. आणि तरीही काही अडचण आलीच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.  

रेल्वे भरती परीक्षेदरम्यान २१ ऑक्टोबर २००८ रोजी मनसेने आंदोलन केलं होतं. रेल्वेतील नोक-यांमध्ये मराठी तरुणांना डावललं जातं, हा मुद्दा राज ठाकरे यांनी शिवसेनेत असतानाच उचलला होता. मनसेच्या स्थापनेनंतरही त्यांनी तो लावून धरला आणि त्यासाठी मनसैनिकांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर ‘ राडा ’ ही केला. त्यावरून बरेच वाद झाले. 2011 मध्ये निघालेल्या रेल्वे भरतीमध्ये मनसेने लाखो तरूणांकडून अर्ज भरुन घेतले होते.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेरेल्वे