स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:48 AM2024-09-22T07:48:59+5:302024-09-22T07:49:09+5:30

बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचे? अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Raj Thackeray appeal to Marathi people again for the assembly elections in the state | स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

मुंबई : गेले अनेक महिने बीडीडी चाळींतील लोक, पोलिस बांधव, कोळीवाड्यातील बांधव येतात आणि चर्चा करतात. तुम्ही मुंबईचे मालक आहात; मग, रडता कसले? परप्रांतातील लोक येऊन इकडे झोपड्या वसवतात, फुकटात घरे घेऊन जातात. कारण, तुम्ही योग्यवेळी योग्य ताकद दाखवत नाही. पाच वर्षे भांडणार आणि मोक्याच्या वेळी घरंगळणार. त्यामुळे प्रकल्प रखडतात. बाहेरच्यांची टगेगिरी सुरू होते. म्हणून स्वाभिमानाने जगायचे असेल तर स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसांना साद घातली. 

वरळी येथील जांबोरी मैदानात शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘व्हिजन वरळी’चे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक शहराचे एक कॅरेक्टर असते. लाल बस ही मुंबईची ओळख होती. आज कोणत्याही शहराला कॅरेक्टर उरलेले नाही. सगळीकडे फ्लायओव्हर ब्रिज होताहेत. ते कोणासाठी आणि का? बाहेरून येणाऱ्यांमुळे मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. जेथे खर्च व्हायला पाहिजे तेथे न होता त्यांना सुविधा देण्यासाठी होत आहे. डेव्हल्पमेंट प्लॅन होतो; पण, टाऊन प्लॅनिंग होत नाही. आपण फक्त स्क्वेअर फुटात अडकलोय, अशी टीकाही त्यांनी केली. 

प्रकल्प लोकांवर लादले जातात

बीकेसीत २० वर्षांपूर्वी तिथल्या अनधिकृत झोपडीधारकांना ऑफर होती की घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळतील. दोन कुटुंबांमागे एका गाडीचं पार्किंग हा अजब प्रकार ऐकला. आज हा चालवणार उद्या तो चालवणार. तुम्हाला किंमत नाही हे लक्षात घ्या. मोठा प्रकल्प येतो तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी  बोलले पाहिजे. तुमची मते घेतली पाहिजेत. असे न करता प्रकल्प तुमच्यावर लादायचा आणि नंतर तुम्हाला विचारायचे हे फक्त वरळीत सुरू नाही, तर राज्यात जागोजागी सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

तुमच्यात फूट पडली तर ते बिल्डरांना हवेच आहे

तुमच्यात फूट पडली तर तेच बिल्डरांना हवे असते. तुम्ही एकत्र राहणे, विचार करणे गरजेचे आहे. मराठी टक्का असलेल्या ठिकाणी या गोष्टी सुरू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. 

ठाणे या एकाच जिल्ह्यात आठ महापालिका आहेत. सर्वाधिक लोंढे या जिल्ह्यात येतात आणि मग ते तिथून मुंबई - पुण्यात जातात. बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचे? अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.
 

Web Title: Raj Thackeray appeal to Marathi people again for the assembly elections in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.