Join us  

Raj Thackeray: अयोध्या दौरा... बृजभूषण सिंहांच्या टोकाच्या टिकेला मनसेचं संयमी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 11:04 PM

उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना संयम बाळगण्याबाबत मनसे अध्यक्षांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या धमकी आणि केलेल्या विधानालाही संयमी उत्तर दिलं. बृजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. एका खासदाराने मांडलेलं मत हे उत्तर प्रदेशचं असू शकत नाही, असे नांदगावकर यांनी म्हटलं. 

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. पण उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आज मोठी बैठक देखील आयोजित केली होती. या बैठकीला हजारो उत्तर भारतीय नागरिक आणि साधू संत उपस्थित होते. खासदार बृजभूषण सिंह यांच्याबाबत बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, नांदगांवकर यांनी संयमी उत्तर देत, जशात तसे उत्तर देण्याची ही वेळ योग्य नसल्याचंच एकप्रकारे सूचवलं. 

त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार असं नाही

मनसेवर टोकाची टिका होत असतानाही मनसेची भूमिका मवाळ असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'विरोध करायचा की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, पण वेळ काळ पहिली पाहिजे. टोकाच्या भाषेमुळे कोणाचा फायदा, तोटा होणार याचाही विचार करावा लागतो. त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरु मारणार असं नाही ना… विचार करावा लागतो”, असे संयमी आणि वेळेची वाट पाहणारे उत्तर बाळा नांदगांवकर यांनी दिले. बृजभूषण सिंह यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची भूमिका आहे. त्याबाबत स्वत: राज ठाकरेच आपली भूमिका मांडतील. उत्तर प्रदेशच्या जनतेनं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागतच केलं आहे आणि आमची त्याबाबतची तयारी देखील सुरू झाली आहे. लवकरच या संदर्भात आणखी एक बैठक होणार असल्याचंही नांदगावकर म्हणाले. 

तीन सभा होताच सगळे नेते अयोध्येला निघाले

राज ठाकरेंच्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या त्यानंतर निर्माण झालेलं वातावरण आणि परिस्थिती संदर्भात तसंच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली. राज ठाकरेंच्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या आणि त्यानंतर अनेक नेते आता अयोध्येला जाऊ लागले आहेत याचा आनंदच आहे, असा टोला नांदगावकर यांनी यावेळी लगावला. "राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता सगळे जागे झाले आहेत. प्रत्येक जण आता मंदिरात आणि अयोध्येला जाऊ लागला आहे. शरद पवारांचे नातू अयोध्येला जाऊन आल्याच कळलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील अयोध्येला जाणार असल्याची माहिती मला मिळाली. तसंच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नेत्यांचे अयोध्या दौरे होऊ लागले आहेत. याचा आम्हाला आनंदच आहे", असं बाळा नांदगावकर म्हणाले.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेउत्तर प्रदेशअयोध्या