Join us

Raj Thackeray: राज ठाकरेंचे राजकीय दौरे, पत्रकार परिषद अन् कार्यक्रमांवर बंदी घाला; हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 8:43 PM

आगामी शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.  इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणाच्या वक्तव्यानं समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणार्‍या, प्रक्षोभक भाषणं करणार्‍या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तुर्तास बंदी घालण्याची मागणीही याचिकेत केली गेली आहे. आगामी शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मशिदीवरील भोंग्यांचा विषय काही एक दिवसाचा नाही. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी यांनी घेतली आहे. हा राजकीय विषय नसून सामाजिक विषय आहे. जोपर्यंत लाऊडस्पीकरवर अजान पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत हनुमान चालीसाचं आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 

राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल-

राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंवर तीन कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. कलम ११६, कलम ११७ आणि कलम १५३ अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी काय डेसिबल मोजत बसायचे का?- राज ठाकरे

मशिदीवरील भोंग्यांवरुन दिली जाणारी अजान हा काय केवळ पहाटेच्या अजानचा प्रश्न नाही. दिवसभरातील विविध वेळांना बांग दिली जाते. याचा लोकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हायला हवा हीच अपेक्षा आहे. विषय काही फक्त मशिदींवरचा नाही. मंदिरांवरही अनधिकृत भोंगे असतील आणि त्याचा लोकांना त्रास होतील तर तेही उतरवले गेले पाहिजेत. विशिष्ट डेसिबलची मर्यादा पाळण्याचं आवाहन करत तुम्ही परवानगी देत आहात. मग काय पोलिसांनी रोज मशिदींबाहेर डेसिबल मोजत बसायचे का? एवढंच काम त्यांना आहे का? त्यामुळे मशिदीवरील भोंगे कायमस्वरुपी उतरवले गेले पाहिजेत. तसं नाही झालं तर आमची लोकं हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणारच, असं राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेउच्च न्यायालयमहाराष्ट्रमनसे