Join us

राज ठाकरेंचा ताफा अडवल्याने संताप; मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आक्रमक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 8:47 PM

बीडमधील घटनेनंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत आक्रमक इशारा दिला आहे.

MNS Raj Thackeray ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यावेळी आज चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला. त्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. या घटनेनंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत आक्रमक इशारा दिला आहे.

"सुरुवात तुम्ही केली, आता शेवट मात्र आम्ही करणार. हे सर्व महाराष्ट्रसैनिकांच्या वतीने मी उबाठाला सांगत आहे," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात मनसेकडूनही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आज ते बीडमध्ये दाखल झाले होते. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. यावेळी हे कार्यकर्ते मशाल चिन्ह असलेला झेंडाही सोबत घेऊन आले होते. राज हे ज्या हॉटेलला थांबणार आहेत त्या दिशेने त्यांचा ताफा निघाला होता. मात्र हॉटेलनजीकच उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर येण्याचा प्रयत्न केला. 'सुपारीबाज चले जाव' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या कार्यकर्त्यांचं नेतृत्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर हे करत होते. राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे विधानसभेला कुणाची सुपारी घेतली असा जाब विचारण्यासाठी आम्ही आलोय असं गणेश वरेकरांनी सांगितले. 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेबीडमनसेशिवसेना