मीरारोड - गेल्या काही दिवसात भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला. पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून टाकला. मराठीत उचापती म्हणतात तसेच हे भोंगापती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. परंतु, ह्या भोंगपती मुळे सर्वात मोठे नुकसान हिंदू भाविकांचे झाल्याचे ते म्हणाले.
मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोना काळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. कोरोना मुळे मृत्यू झाल्यावर प्रेताच्या जवळ देखील जायला घाबरायचे. मृतदेह कोणी उचलले व अंत्यविधी कोणी केले त्यांचे धर्म कोणते ह्याचा विचार देखील त्यावेळी कोणी केला नाही . केवळ माणुसकी दिसत होती. पण कोरोना गेला आणि नेत्यांना पुन्हा धर्म - जात आठवायला सुरवात झाली.
भोंगा हा विषय होता का? पण साहेब तोंडावर आपटले. सर्वात मोठी अडचण भाविक श्रद्धाळू हिंदूंची झाली. कारण शिर्डीची शेजारती- काकड आरती कर्ण्या वरून व्हायची बंद झाली. पंढरपूरची विठ्ठल -रखुमाईची, तुळजापूरची आरती देखील तशीच बंद झाली. मंदिराच्या गाभार्या बाहेर उभे राहून कर्ण्या वरून ऐकू येणारी आरती भाविक करायचे. दुसरीकडे मुस्लिमांनी निर्णय घेत दिड मिनिटाची अजाण भोंग्यावरून बंद केली.
स्वतःच खणलेल्या खड्ड्यात माणूस कसा पडतो त्याचे उद्दाम उदाहरण भोंगापती आहे. दोन समाजात आगी लावाव्यात ह्यासाठी केलेले नाटक अंगाशी आले आहे. साहेब कधी गॅस वर बोलले नाहीत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅस इतका महागला आहे. महागाई वाढली आहे मग लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी असली लोकं पुढे करायची आणि स्वतःच्या राजकीय चुका लपवायच्या. खरी समस्या बेरोजगारी, महागाई आहे असे आव्हाड म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, साजिद पटेल, अनु पाटील आदी उपस्थित होते.