मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलन तीव्र होत चालले असून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी पहाटेपासूनच हनुमान मंदिरात आरती करायला, मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवण्यास सुरूवात केली आहे. तत्पूर्वी, राज्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरू केली आहे. तर, आज पहाटे ६ वाजण्यापूर्वी मशिदींवर भोंगे वाजवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी ८०३ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. ११४४ मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुंबईतील ११४४ मशिदींपैकी १३५ मशिंदीकडून आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. मुंबईतील १३५ मशिदींवर आज पहाटे ६ वाजण्यापूर्वीच भोंगे वाजल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे, या मशिदींवरील संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मनसैनिकांची धरपकड सुरू; पोलीस कारवाईला वेग
मुंबईत मनसे नेते तसेच कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी पार्क परिसरातून संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते, पण ते गाडीतून निघून गेले. मुंबई पोलीस रात्रीपासून त्यांचा शोध घेत होते. दुसरीकडे पुण्यात अजय शिदेंसह 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हनुमान मंदिरात महाआरती केल्यानंतर त्यांच्यावर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास १५,००० मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. तसेच मुंबई बाहेर जाण्याचे आदेश देखील त्यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.