Raj Thackeray, Siddhivinayak: "अंबानी आले की वेळप्रसंगी सुरक्षारक्षकाचेही काम करता, मग राज ठाकरे आले असतानाच एवढी कसली मस्ती?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:06 PM2022-09-03T15:06:31+5:302022-09-03T15:07:05+5:30
समाधान सरवणकरांनी सिद्धिविनायक मंदिरातील शिवसेनेच्या ट्रस्टींवर केली खरमरीत टीका
Raj Thackeray vs Shiv Sena: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक (Siddhivinayak Temple) मंदिरात जाऊन सहकुटूंब गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. राज ठाकरेंसोबत यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी राज यांच्यासमवेत त्यांचा नातू किआनदेखील सिद्धिविनायकाच्या चरणी पाया पडण्यासाठी आपल्या आजी-आजोबांसोबत आला होता. ४ महिन्यांच्या किआनने बाबा अमित ठाकरेंच्या कडेवर असताना बाप्पाला नमस्कार केला. या दरम्यान, राज ठाकरे सहकुटुंब सिद्धिविनायक दर्शनाला येणार आल्याचे माहिती असूनही शिवसेनेचे काही विश्वस्त मंडळी तेथे उपस्थित न राहिल्यामुळे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.
Maharashtra | MNS chief Raj Thackeray and his family have darshan of Lord Ganesh and offer prayers at Shri Siddhivinayak Temple in Mumbai. pic.twitter.com/UJpcrqRmjG
— ANI (@ANI) September 3, 2022
आज राज ठाकरे सहकुटुंब सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घ्यायला गेले होते, परंतु जेव्हा अंबानी येतात अध्यक्षापासून सर्व शिवसेनेचे ट्रस्टी हजेरी लावतात व वेळेला सुरक्षारक्षकाचे देखील कामही करतात, पण आज ही मंडळी गैरहजर होती. एवढा द्वेष कसला? एवढी मस्ती कसली? हे पक्षाचे कार्यालय नाही आहे. हे महाराष्ट्राच्या आराध्यदैवत सिद्धिविनायक बाप्पाचा दरबार आहे आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत व हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन चालले आहेत, याचा आदर नक्कीच झाला पाहिजे. बाप्पा सगळं बघतो आहे. योग्य उत्तर मिळेल, अशी फेसबुक पोस्ट करत समाधान सरवणकर यांनी आदेश बांदेकरांसह शिवसेनेचे सर्व विश्वस्त मंडळींवर खरमरीत टीका केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेतेमंडळी आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटी हा चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. राज ठाकरे यांची नुकतीच हिप बोन रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे नेतेमंडळी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येते. मात्र, या भेटींमागे काही राजकीय समीकरणे दडलेली आहे, असे राजकीय तज्ञ्जांचे मत आहे. तशातच, यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बड्या नेत्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यात राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ'वरही ते गेले होते. तेथे काही गप्पाही रंगल्या. त्यामुळे भविष्यात या गप्पांचा काय निष्कर्ष निघतो, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.