Raj Thackeray: राज ठाकरे ब्रिलियंट माणूस, अशोक मामांनी सांगितलं राज"कारण"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 03:28 PM2023-01-09T15:28:20+5:302023-01-09T15:46:48+5:30
राज ठाकरेंच्या हातून माझा सन्मान होतोय, हे मी माझं भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.
मुंबई - आज हा जो सोहळा होतोय, मला जे मानपत्र दिलं जातंय ते राज ठाकरेंच्याहस्ते दिलं जातंय. राज ठाकरे हा माणूस माझा आवडता आहे. अभ्यास करून ते बोलतात. ते अतिशय ब्रिलियंट आहेत. बोलणारे लोक भरपूर आहेत, पण अभ्यास करुन बोलणारे लोक कमी आहेत. त्यात राज ठाकरे हे आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं. तसेच, राज ठाकरेंच्या हातून माझा सन्मान होतोय, हे मी माझं भाग्य समजतो, असेही ते म्हणाले. मराठी किंवा हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या पाठिशी कायम उभे राहणारा नेता म्हणजे राज ठाकरे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं.
अभिव्यक्ती प्रस्तुत व रावेतकर आयोजित अशोक पर्व या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला ते आले होते. तेव्हा ते बोलत होते. अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरी व चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षानिमित्त हा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी अशोक सराफ यांचा सन्मान राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. अभिनेते प्रशांत दामले, निवेदिता सराफ, राजेश दामले, अमोल रावेतकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना अशोक सराफ यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्याकडून माझा सन्मान होतोय, ते माझे खरोखर भाग्य आहे, असे अशोक मामांनी म्हणताच व्यासपीठावरील राज ठाकरे यांनी दोन्ही हाताने आपला चेहरा लपवला आणि त्यानंतर अशोक सराफांना नमस्कार केला. विशेष म्हणजे आपल्या भाषणात राज ठाकरेंनीही अशोक सराफ यांचं मोठं कौतुक केलं. असा दागिना सराफाच्याच घरी जन्माला येऊ शकतो, असे राज यांनी म्हटले. तसेच, अशोक सराफ यांनी केलेल्या कौतुकाबद्दल बोलताना आज माझीच ७५ वी साजरी होतेय की काय, असं मला वाटलं, अशी मिश्कील टिपण्णीही राज यांनी केली.
... तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते
कलावंतांमुळे देशात अराजकता पसरलेली नाही. कारण कलावंतांमुळे आपण त्यात गुंतून राहतो आणि दुसरीकडे लक्ष जात नाही. आपल्याकडे अशोक सराफ हे गेली पन्नास वर्षे चित्रपटसृष्टीत राहून आपल्याला हसवत आहेत. खरंतर ते दक्षिणेकडे हवे होते. तिथे असते, तर ते आज मुख्यमंत्री झाले असते. परंतु, आपल्याकडे मात्र तसे महत्त्व दिले जात नाही. परदेशात कलावंतांची कदर केली जाते. अशोक सराफ हे युरोपात असते, तर तिथे खुद्द पंतप्रधान अशा कार्यक्रमाला आले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
सराफांनी बेळगावचा प्रश्न सोडवायला हवा
सराफ हे मूळ बेळगावचे आणि जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनी बेळगाव सीमावाद प्रश्न सोडवायला हवा. यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खुद्द अशोक सराफ यावर खळखळून हसले.