मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. या व्यंगचित्रात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वर्गाबाहेरचे विद्यार्थी असे म्हटले आहे. तर सरसंघचालक मोहन भागवत यांची शिकवण मोदी अन् शाह विसरल्याचा टोलाही राज यांनी लगावला. राज यांचे हे व्यंगचित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या फटकाऱ्यांतून मोदी अन् अमित शाहंच्या दंडेलशाहीवर प्रहार केला आहे. मोदी एका सिंहासनावर बसले असून त्या सिंहासनावर त्यांचाच फोटो लावण्यात आला आहे. तर मोदींच्या शेजारी अमित शाह त्यांच्या सिंहासनाला टेकून बसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे सिंहासनाधीश्वर मोदींनी आपला उजवा पाय पुढे केला असून देशातील व्यवस्था त्यांच्या पायाशी लोटांगण घालत असल्याचे राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून सांगितले आहे. तर मोदीचा हुकूमशाहीची जबाबदारी शाह यांच्याकडे असून 'धाकदुपटशहा' असे असे नाव शाह यांना दिले आहे. मोदींच्या पाठिशी सरसंघचालक मोहन भागवत हाताची गडी घालून मोदींचा रुबाब पाहताना दिसत आहेत.
दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संघाचा स्वयंसेवक चर्चा करत असून मोहनजी, जी शिकवण आपण आम्हाला दिली, ती या दोघांना का नाही दिली ? असा प्रश्न तो स्वयंसेवक भागवत यांना विचारत आहे. राज यांनी मोहन भागवत यांच्या दिल्लीतील राष्ट्रभक्तीवरील भाषणाचा संदर्भ देत हे व्यंगचित्र रेखाटले आहे.