Join us  

Raj Thackeray: राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिंदेंच्या मंचावर दिसणार?; स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 10:02 AM

जे २०१९ मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. २०१९ मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला ४० आमदार, १२ खासदारांनी ताकद दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदें यांचे नाव पुढे करून भाजपानंही खेळी खेळली. त्यात आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे.

हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. त्यात दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावं अशी गळ घालण्यात येत आहे. तसेच शिंदे गटातील काही आमदारांकडून राज ठाकरेंना दसरा मेळाव्यात बोलवण्याची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. आम्ही कोणासोबत युती केली आहे, २०१९मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. आम्ही चुकीचं काम केलं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आज जनता खुश आहे. जे २०१९ मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. २०१९ मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अनेक लोक मला म्हणाले, आम्ही युतीला मतदान केलं होतं. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे असे नवीन प्रयोग करताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आमची मतं घेऊन आमच्याशी विश्वासघात झाला होता, असं लोकांचं मत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे दसरा मेळाव्यात दिसतील का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आताच कसं बोलू?,थोडावेळ द्या, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दसरा मेळाव्याला अजून खूप अवधी आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

दसरा मेळावा आमचाच - उद्धव ठाकरे

५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना