महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. कोहिनूर मिल प्रकरणी २२ ऑगस्टला राज ठाकरेंना ईडीपुढे हजर राहायचं आहे. त्यावरून, मनसे खवळली असून भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. कारण, ईडीचं काम स्वतंत्रपणे सुरू असतं. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे राज यांना नेमकी कशासाठी नोटीस आलीय याबद्दल मी अनभिज्ञ आहे. ईडीच्या चौकश्या सुरूच असतात. त्यात सूडबुद्धीचा संबंध कुठे आला? चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मनसेचा आरोप फेटाळला. ईडीला एखादं ट्रान्झॅक्शन दिसलं, तर ते चौकशीला बोलावतात. त्यात काही गैर सापडलं नाही तर सोडून देतात. पण चूक असेल तर ती भोगावीच लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळीच त्यांनी भाजपाला लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे आणि मनसैनिकांनाही फटकारलं.
राज ठाकरेंना बजावण्यात आलेल्या नोटिशीनंतर त्यांच्या पत्नी शर्मिला यांनीही अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला लक्ष्य केलं. सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे अशा नोटिशी आम्हाला येत असतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यावर, लोकशाहीत कुणीही कुठलेही आरोप करू शकतो, एवढीच प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोहिनूर मिल प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून ईडीनं माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी आणि राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस म्हणजे भाजपाचे दबावतंत्र आहे, मोदी-शहांविरोधात बोलल्यानं सुडाने ही कारवाई केली जात आहे, असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच, २२ तारखेला अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. ठाणे आणि कल्याण बंद ठेवण्याचं आवाहन स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी केलंय.
दुसरीकडे, या नोटिशीशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं राज्य सरकारमधील मंत्र्यांचं म्हणणं आहे. चूक नसेल तर राज ठाकरेंना घाबरण्याचं काहीच कारण नाही, बिनधास्त चौकशीला सामोरं जावं, असा प्रेमाचा सल्ला राज यांचे मित्र आणि भाजपा नेते विनोद तावडे यांनी दिला आहे.
राज यांना ईडीची नोटीस येताच, भाजपाविरोधक त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, राजू शेट्टी यांनी राज यांची बाजू घेत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ईव्हीएम विरोधात सुरू असलेलं आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.
मोदी-शहांचं पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे