Join us

"यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीला फाशी द्या"; शक्ती कायद्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 11:21 AM

उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

Yashashree Shinde Murder Case:  नवी मुंबईच्या उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. आरोपी दाऊद शेखने यशश्रीवर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. यशश्री शिंदेने लग्नाला आणि बंगळुरुला येण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याची कबुली दाऊद शेखने दिली. हत्येनंतर आरोपी दाऊद शेख हा कर्नाटकला पळून गेला होता. नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक करुन नवी मुंबईत आणलं. यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू होते. त्यापैकी एकावर दाऊदचं नाव होतं आणि त्यातूनच पोलीस दाऊदपर्यंत पोहोचले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली असताना आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे शिष्टमंडळ देखील होते. या बैठकीदरम्यान मनसे नेत्यांनी विविध प्रश्नावर चर्चा केली. तसेच या भेटीत राज ठाकरे-उरण येथील यशश्री शिंदे हत्याप्रकरणीही चर्चा करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

"उरण येथील यशश्री शिंदे हिचं झालेलं निर्घृण हत्याकांड, तसंच शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे हिच्या झालेल्या हत्याकांडाबद्दल पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि आमदार आणि पक्षाचे नेते राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करत आरोपीना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच शक्ती कायदा जरी राज्यातील दोन्ही सभागृहाने मान्य करून त्याचा मसुदा केंद्राकडे पाठवला असला तरी त्यातील काही तरतुदींवर केंद्राचे आक्षेप आहेत, त्यामुळे या कायद्याला केंद्राकडून मंजुरी मिळत नाहीये, यावर राज्य शासनाने केंद्रसरकारकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी अविनाश अभ्यंकर यांनी केली," अशी माहिती मनसेने दिली.

दरम्यान, २५ जुलै रोजी यशश्री दाऊदला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर २७ जुलै रोजी यशश्रीचा मृतदेह उरण स्थानकाजवळ आढळून आला. यशश्रीच्या मृतदेहाचे लचके कुत्र्यांनी तोडले होते. धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. दाऊद शेखने एवढ्यावरच थांबता त्याने यशश्रीचा मृतदेह ठेचला आणि गुप्तांगावही वार केले.  

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदेनवी मुंबई