Join us

राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 6:22 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २ डिसेंबरला हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले.

राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ‘वर्षा’वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज ठाकरे यांच्यासोबत  मनसेचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकाने आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी  पुनर्विकास आदी मुद्यांसह सद्य राजकीय  परिस्थितीवर चर्चा झाल्याचे समजते.  मनसेने  स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचे गणित कसे असेल, याचा अभ्यास महायुतीकडून केला जात आहे. मात्र,  लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे.

लोकसभेची तयारी : मुख्यमंत्री दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात ६ जानेवारी रोजी यवतमाळ, वाशिम आणि रामटेकपासून होईल. ३० जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यात दौरा संपेल. उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांना ही माहिती दिली.

असा असेल दौरा६ जानेवारी - यवतमाळ, वाशिम, रामटेक ८ जानेवारी - अमरावती, बुलढाणा१० जानेवारी - हिंगोली, धाराशीव ११ जानेवारी - परभणी, संभाजीनगर२१ जानेवारी - शिरूर आणि मावळ २४ जानेवारी - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग २५ जानेवारी - शिर्डी आणि नाशिक२९ जानेवारी - कोल्हापूर३० जानेवारी - हातकणंगले 

 

टॅग्स :राज ठाकरेएकनाथ शिंदे