मुंबईः देशाला पडत चाललेल्या मंदीच्या विळख्यावरून राज ठाकरेंनी मोदी-शहांना चांगलेच धारेवर धरले आहे. देश आर्थिक गर्तेत चालला आहे पण मोदी भक्तांचं लक्ष नाही, ते सध्या आनंदात आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्यावर जेव्हा ह्या आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळेल तेव्हा त्यांना कळेल. ह्या आर्थिक अडचणींकडे लक्ष जाऊ नये म्हणून समान नागरिक कायदा, राम मंदिर मुद्दे पुढे आणून तुमचं लक्ष विचलित करायचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला आहे. काल नरेंद्र मोदी म्हणाले की, 370 कलम काढल्यावर काश्मीरमध्ये रोजगार निर्माण करू, पण अनेक राज्यात भाजपाची सत्ता आहे, मग तिथे गेल्या 5 वर्षात रोजगार का निर्माण करू नाही शकलात? गेल्या 45 वर्षांतला बेरोजगारीचा आकडा सगळ्यात जास्त आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 14 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जवळपास 6 लाख मध्यम उद्योग बंद पडलेत आणि हे सगळं एका माणसाला आलेल्या नोटाबंदीच्या झटक्यामुळे झालं. जीएसटी आणला पण केंद्राकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे महापालिकांना पैसा नाही, मग शहरं चालणार कशी ?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.