मुंबई - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरुन खडाजंगी झालेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उभे करता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराचं रणधुमाळी सुरु केलीय. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांचा समाचार घेतला होता. मात्र फडणवीसांच्या या टीकेची फिरकी राज यांनी घेतली आहे.
अल्बमध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये’ असा टोला राज यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका करताना ‘रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतय खुळं’ असं म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. त्यावर राज यांनी ‘द रिव्हर अँथम’ या अल्बममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका साकारली होती त्यावरुन हा टोला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा असं आवाहन राज ठाकरे हे त्यांच्या सभांमधून करत आहेत. राज ठाकरेंनी भाजपाला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरलं आहे. मागच्या वेळी देखील राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता तर यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर हवा गेलेला फुगा अशारितीने टीका केली होती.
त्यानंतर मनसे पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आत्ता उमेदवार नसलेली सेना म्हणजे उनसे झाली आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेकडूनही बीजेपी म्हणजे भारतीय जुमला पार्टी असं प्रतिउत्तर केलं होतं. यानंतर सातत्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी टीका राज ठाकरे यांच्यावर सुरु ठेवली होती. त्याच राज ठाकरे यांनीही चांगला समाचार घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे-भाजपामधलं वाकयुद्ध असचं रंगत जाणार हे स्पष्ट आहे.
मनसे आता झाली 'उनसे', उमेदवार नसलेली सेना, मुख्यमंत्र्यांचा राजना टोला