Join us

ईव्हीएमविरोधात आता 'जन की बात'; घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार; राज ठाकरेंचं पुढचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:22 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेतली आहे.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत 371 मतदारसंघांत घोळ आहे, 54 लाख मतं वाढीव आहेत. त्यामुळे EVM विरोधात प्रत्येक राज्यांराज्यांत उठाव होणार आहे. जर 200च्या पुढे जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे. मी निवडणूक आयोगाला विचारलं ईव्हीएमची चिप कुठे बनते, ते म्हणाले अमेरिकेत. ज्या अमेरिकेत गोंधळ सुरू आहे, त्या अमेरिकेत चिप बनते त्यावर आमच्या जनतेने विश्वास कसा ठेवायचा?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. यापुढे आंदोलनात राजकीय पक्षांचा झेंडा किंवा चिन्ह दिसणार नाही. आम्ही महाराष्ट्रात लोकांच्या घरोघरी जाऊन बॅलेट पेपरनं निवडणूक व्हाव्यात, यासाठी फॉर्म भरून घेणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव, फोटो आणि सही असलेले ते फॉर्म जनतेकडून भरून घेतले जातील. विरोधकांचा 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा निघणार असून, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे जनतेनं भरलेले फॉर्म देण्यात येतील. हा पहिला टप्पा असेल, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हाव्यात, यासाठी जनतेला आवाहन करत आहोत, त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

विरोधकांच्या पत्रकार परिषदेला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी, बी. जे. कोळसे पाटील, विद्या चव्हाण, बाळासाहेब थोरात, कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांनी मतदान केलेलं आहे, त्यालाही आपण त्याच उमेदवार आणि चिन्हाला मतदान केलं आहे का हे समजलं पाहिजे. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :राज ठाकरेएव्हीएम मशीन