शेतकऱ्यांनो सत्ताधाऱ्यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नका - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 08:01 AM2018-11-08T08:01:00+5:302018-11-08T08:16:36+5:30
शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीतून टीकास्त्र सोडले आहे. आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. शेतकरी प्रश्नावर भाष्य करणारे हे चित्र आहे. या चित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे. दोघांनीही साडी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय, शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.
दोघंही शेतकऱ्याला पाडव्यानिमित्त ओवाळायला आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्याला दटावते की, ऐका...आताच सांगून ठेवते ! एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!, अशा आशय राज ठाकरेंनी चित्राद्वारे मांडला आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून, अशी आश्वासनं शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाली, मात्र अद्यापपर्यंत एकाही निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना शेतकऱ्यांची-मतांची आठवण होते, तर त्यांना दमडीही देऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे हाणला आहे.
('फेकलेले' आकडे पाहून लक्ष्मीही थक्क, राज ठाकरेंचा मोदी-फडणवीस-गडकरींवर वार)
दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशाही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. जनतेला देण्यात येणाऱ्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणारे व्यंगचित्र त्यांनी रेखाटले होते. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या फोटोंसमोर लक्ष्मी उभी आहे. या तिघांच्या फोटोंना पाहून लक्ष्मी म्हणतेय की,'बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे'. अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी या तिघांवर तिखट शब्दांत टीका केली आहे.