Join us

"जो कुणाचाच नाही झाला, त्याबद्दल..."; राज ठाकरेंचे सदा सरवणकरांवर टीकेचे बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 9:21 AM

Raj Thackeray sada Sarvankar: अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी राज ठाकरेंची प्रभादेवी येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना लक्ष्य केले. 

Raj Thackeray Sada Sarvankar News: माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. विद्यमान आमदार सदा सरवणकर हे माघार घेतील, अशी चर्चा होती. पण, सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. रविवारी राज ठाकरेंनी अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी ठाकरेंनी सदा सरवणकर यांना लक्ष्य केले. 

राज ठाकरे सदा सरवणकर यांच्याबद्दल काय बोलले?

प्रभादेवी येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांच्यावर नामोल्लेख न करता टीकेचे बाण डागले. 

"मला कल्पना आहे की, मी आज इथे प्रभादेवीमध्ये आलोय. तुमची एक अपेक्षा असेल की, मी समोर जे उमेदवार उभे त्यांच्याबद्दल काही बोलावं. मला नाही वाटत मी काही बोलावं. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण, जो कोणाचाच नाही झाला, त्याबद्दल आपण काय बोलायचं?", असे म्हणत राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला. 

 "मागे बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली. मग काँग्रेसमधून आमदारकीला पडली, मग पुन्हा शिवसेनेत आली. मग पुन्हा निवडणूक लढवली. मग पुन्हा एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यावर पेट्रोलपंपावर एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेंबरोबर जाऊन बसले. कोण ही माणसं? व्यक्ती म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, हे आपले आहेत की नाही, त्यांच्याबद्दल आपण काय आणि किती बोलणार?", अशा शब्दात राज ठाकरेंनी सरवणकरांवर हल्ला चढवला. 

ठाकरेंच्या महेश सावंत यांच्यावरही हल्ला

राज ठाकरे म्हणाले, "याच व्यक्तीबरोबर (सदा सरवणकर) दुसरे जे उमेदवार (महेश सावंत) उभे आहेत. ते पण त्याचवेळी बाळासाहेब हयात असताना शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक निवडणुकीत होते", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्यावर राज ठाकरेंनी केली. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकमाहीमवरळीराज ठाकरे