मुंबई - काल राज्याच्या राजकीय वर्तुळात घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. आधी पद स्वीकारणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावल्याने त्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यादरम्यान, आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोलाचा सल्लाही दिला आहे.
राज ठाकरे या पत्रात म्हणतात की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारलीत त्याबद्दल तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच परत याल. परंतु, ते व्हायचं नव्हतं, असो...
तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केलं आहे. आताचं सरकार आणण्यासाठीही तुम्ही अपार कष्ट उपसलेत. एवढं असूनही मनातील हुंदका आवरत पक्षादेश शिरसावंद्य मानत उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे. हे तुम्ही तुमच्या कृतीमधून दाखवून दिले आहे. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय असते त्याचा हा वस्तूपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे, खरोखरच अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिले आहे.
पत्रात ते पुढे म्हणतात की, ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे घ्यावी लागते. ह्या मागे घेतलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही. तुम्हाला यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.