Join us  

Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 9:47 AM

शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर हनुमान जयंतीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर, शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली. शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या महाआरतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. पुण्यात स्वत: राज ठाकरे हजर होते. तर, दादरच्या महाआरतीला स्थानिक नेत्यांसह शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवसेनेनं महाआरतीचं आयोजन केल्यानंतर त्यावरुन मनसेकडून खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ''संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते, सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी आणि नव पुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही,'' असे म्हणत देशपांडेंनी महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांवर टिका केली आहे.  मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज चांगलीच फरफट झाली. नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला महाआरती. राज साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, असेही संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. 

शरद पवारांची परवानगी घेतली का?

शिवसेनेकडून दादरमध्ये आयोजित महाआरतीवरुन देखील संदीप देशपांडे यांनी टोला लगावला होता. “राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी देखील महाआरतीचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हीच भूमिका त्यांनी ३ तारखेनंतर देखील कायम ठेवावी. आज महाआरती करत आहात. पण शरद पवारांची यासाठी परवानगी घेतली आहे का हे देखील तपासून घ्यावं. नाहीतर पुन्हा महाआरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :मनसेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसहनुमान जयंतीराज ठाकरेसंदीप देशपांडे