मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भयंकर आहे. जो विरोधात बोलतो त्याच्याविरोधात ईडीचं, चौकशीचं हत्यार उगारलं जातं. परंतु, राज ठाकरे कुणालाच भीक घालत नाहीत आणि आम्हीही घाबरणारे नाही. ईडी-बीडी आम्ही काही मानत नाही, असा पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राज यांना पाठविण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीवरुन अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या भेटीनंतर विद्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या. अमित शहांकडे गृहमंत्रिपद आहे. इकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे. म्हणून पोलिसांचा, तपास संस्थांचा गैरवापर केला जातोय. इतके दिवस का लावली नाही ईडीची चौकशी? हे हत्यार किती जणांवर उगारणार?, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
तसेच ईव्हीएमविरोधात राज ठाकरे विरोधी पक्षांना एकत्र करत आहेत. राज ठाकरेंनी विरोधकांना एकत्र करुन ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडलं आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे. त्यासाठी राज यांना दडपण्यासाठी सरकारकडून असं राजकारण केलं जात आहे. विरोधकांना घाबरविण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकायचं असेल तर जेलभरो आंदोलन करु असा इशाराही राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिला.
दरम्यान राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली. कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असं राजकारण केलं असतं तर आज भाजपचा 'भा' पण शिल्लक ठेवला नसता असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. कोहिनूर मिल प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीपुढे चौकशीसाठी हजर राहायचं आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची आजच ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत.