राज ठाकरेंचा दसरा मेळावा?; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादात आता मनसेची उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:43 PM2022-08-30T12:43:15+5:302022-08-30T12:43:47+5:30
हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे.
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची असा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला ४० आमदार, १२ खासदारांनी ताकद दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदें यांचे नाव पुढे करून भाजपानंही खेळी खेळली. त्यात आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.
हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा वारसा आम्हीच पुढे घेऊ जाऊ असा दावा मनसे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंकडून केला जात आहे. त्यात दसरा मेळावा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात आता मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंना दसऱ्याच्या दिवशी जनतेला संबोधित करावं अशी गळ घालण्यात येत आहे. याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, दसरा मेळाव्याला देशातील तमाम हिंदुला, महाराष्ट्रातील मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सोनं लुटलं जायचं. २०१२ नंतर ही परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते. दसरा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार आणि मराठी माणसांचे विचार ही जनतेला सवय झाली होती. आज जो वाद सुरू आहे तो स्थळावरून आहे असा टोला मनसेने लगावला.
तसेच राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितल्याप्रमाणे वारसा हा विचारांचा असतो, वास्तूंचा नाही. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे गेले पाहिजेत. हिंदुत्वाचा, मराठी माणसांचा विचार पुढे जायला हवा. त्यामुळे सर्व महाराष्ट्र सैनिक राज ठाकरेंना विनंती करणार आहोत, की, देशातील सर्व हिंदु जनता, महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता ही ते विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी त्यादिवशी जनतेला संबोधित करावं अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
दसरा मेळावा आमचाच - उद्धव ठाकरे
५६ वर्षांत शिवसेनेने असे ५६ लोक पाहिले. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथे ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सुनावले. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून संभ्रम-बिंभ्रम अजिबात नाही. दसरा मेळावा आमचाच, म्हणजे शिवसेनेचाच होणार आणि शिवतीर्थावरच (शिवाजी पार्क) होणार. तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक भाग आहे, ते बघूच. पण आमचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.
बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ
शिवसेना ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत शिवसेनेचं रोपटं बाळासाहेबांनी लावले. त्याचे वृक्षात रुपांतर झाले आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत. महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या स्वप्नातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे लाभले आहेत. बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदे एकनिष्ठ आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचे पालन करणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत. विचारधारा महत्त्वाची आहे, मैदान नाही असं सांगत मंत्री दीपक केसरकरांनीही शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.