भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:59 PM2019-08-21T12:59:21+5:302019-08-21T13:24:57+5:30
राज ठाकरे यांचे चुलत भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे, याबद्दल उत्सुकता होती.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून 22 ऑगस्ट रोजी त्यांची चौकशी होणार आहे. या नोटीशीमुळे राज्यातील राजकारण तापलंय. मनसैनिक चांगलेच खवळले असून ते सत्ताधारी भाजपावर सुडाच्या राजकारणाचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची काय भूमिका आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
राज ठाकरे यांचे चुलत भाऊ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे, याबद्दल उत्सुकता होती. अखेर आज चार दिवसांनंतर उद्धव यांनी या प्रकरणी मौन सोडलं आहे आणि त्यांनी राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे. त्यानंतर, मनसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर, विरोधी पक्षातील नेत्यांनीही राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. भाजपा सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही मनसेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांनी बंदचा इशारा दिला होता. मात्र, लागलीच राज यांनी हस्तक्षेप करून लोकांना त्रास होईल, असे काही करू नका, अशी सक्त सूचना दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, अशी सक्त ताकीद राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली आहे.
राज ठाकरेंच्या ईडी चौकशीबाबत आता उद्धव ठाकरेंनी सूचक आणि बोलकी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरेंच्या ईडी चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत जास्त बोलण्यासही उद्धव ठाकरेंनी नकार दिला. दरम्यान, काँग्रेस नेत्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आपलं मत मांडलं आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या -
चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, जामिनावर सरन्यायाधीश देणार निर्णय
... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात
शिवबंधन बांधलं ! काँग्रेसच्या गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत
मनसैनिकाची आत्महत्या; राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं स्वत:ला पेटवलं!
हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?