राज ठाकरे ईडीच्या रडारवर?; ‘राज’कीय दबावाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 09:30 PM2019-08-01T21:30:18+5:302019-08-02T06:12:04+5:30
आता येत्या आठवड्याभरात राज ठाकरे यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणाऱ्या मनसचे प्रमुख राज ठाकरे यांना विधानसभा निवडणूकीच्या प्रचारापूर्वी दबावाखाली आणण्याचे राज्यकर्त्यांंनी प्रयत्न सुरु केले आहेत. कोहीनूर मिल खरेदी प्रकरणात त्यांची सकतवसुली संचालनालयाकडून (ईडी)चौकशीच्या फेऱ्यात अडकविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोहीनूर सीटीएनएल कंपनीच्या मुख्य वित्त अधिकाऱ्याचा नुकताच जबाब घेण्यात आलेला आहे. आता येत्या आठवड्याभरात राज ठाकरे यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राज ठाकरे यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. भाजपा- सेना विरोधातील सर्व पक्षाच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी कॉग्रेसच्या संसदीय बोर्डाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, त्याचप्रमाणे ईव्हीएम मशीनच्या विरोधात निवडणूक आयुक्तांना निवेदन दिली. तर दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकत्ता येथे जावून भेट घेतली आहे. त्या पाश्वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्याकडून पुन्हा भाजपावर तोफ डागली जावू शकते, त्यामुळे त्यांना राजकीय दृट्या अडचणीत आणण्यासाठी ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला जाईल, असे सांगितले जाते.
दादर येथील कोईनूर मिलची खरेदी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अधिक शिरोडकर व राज ठाकरे यांच्या भागीदारीतून करण्यात आलेली होती. त्यामध्ये कोहीनूर मिल जागा-३ च्या खरेदी२१२१ कोटीमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी कर्जात गेल्यानंतर राज ठाकरे व शिरोडकर यांनी ९० कोटीमध्ये आपले शेअर्स विकले होते. याप्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरु आहे. राज ठाकरे यांना चौकशीला पाचारण करुन त्यांच्यावर दबाव आणला जाईल, असे सांगण्यात येते.