अनेक प्रलंबित विषयांवर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; सकारात्कम प्रतिसाद मिळाला- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:57 PM2023-04-20T18:57:20+5:302023-04-20T19:15:18+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडीडी चाळ, सिडको घरे यासह इतर महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बीडीडी चाळीचा पुनर्विकास, सिडकोतील घरांच्या किमती यासह इतर महत्वाच्या विषयांवर ठाकरे-शिंदे यांच्यात चर्चा झाली. यावेळी अनेक अधिकारीदेखील तिथे उपस्थित होते. दरम्यान, बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे म्हणाले की, 'बैठकीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. तिथे नेमकं काय होणार आहे, हे तिथल्या लोकांना माहितीच नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी आले होते, ते लवकरच त्या लोकांसमोर प्रेझेन्टेशन करुन माहिती देणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी सिडकोसंदर्भातही बोलणं झालं. 22 लाखाचे घर 35 लाखाला केले आहे, ते परत 22 लाखाला कसे करता येईल, यावरही चर्चा झाली.'
संबंधित बातमी- 'कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो', राज ठाकरे स्पष्टच बोलले
'पोलिसांच्या घरांच्या संदर्भात बैठक होणार आहे. कलेक्टर लाईनच्या शासकीय घरांबाबतही बैठकीत चर्चा झाली. तिथे अनेक जीर्ण घरे आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पॉलिसी करतील. एकूण सगळ्या बाबत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाच पाहिजे, असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जात होता. पण, तो आजपासून बंद होईल. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,' अशी माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.