मुंबई: एकीकडे राज्यात शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हिप बोनवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. गेल्या काही दिवसांपासून राज यांच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. पाय दुखण्याचा त्रास त्यांना सुरू झाला होता. राज ठाकरे यांच्यावर सुरूवातील १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. कोरोना डेड सेलमुळे त्यांच्यावर नियोजित दिवशी शस्त्रक्रिया झाली नाही. पण नंतर योग्य ती खबरदारी व विश्रांती घेऊन राज सोमवारी लिलावती रूग्णालयात दाखल झाले आणि त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. राज ठाकरे यांनी एका छोटाशा सोशल मीडिया संदेशाद्वारे या संबंधी माहिती दिली.
'आपल्या आशीर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रीया व्यवस्थितरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रूग्णालयातून बाहेर पडून घरी पोहोचलो आहे! आपले आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम असो! आपला नम्र- राज ठाकरे', असा मोजक्या शब्दांचा संदेश लिहीत त्यांनी शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली.
राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते गेले चार दिवस लिलावती रुग्णालयात होते. पण मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे मनविसेचे पुनर्बांधणी संपर्क अभियान राबवून मनसेला उभारी देण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसले. मागील दोन आठवड्यात अमित ठाकरेंनी ३५ विधानसभा मतदारसंघात मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या अंतर्गत सुमारे ७००० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून मविआ नेते आणि भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावेळी राज ठाकरे जरी काही काळासाठी राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांचे सुपूत्र मात्र पक्षबांधणी व संघटना मजबूत करण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.