मुंबईवीज बिलाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिलं भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. मनसेने वीजबिल माफीवरुन आक्रमक भूमिका राज्यभर आंदोलन केलं. तर भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर देखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.
राज ठाकरे, फडणवीस आणि बावनकुळेंनी वीजबिल भरलं असल्याच्या नितीन राऊत यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. ''आम्ही वीजबिल भरुच आणि ते भरायलाच हवं. नितीन राऊत यांनीही ते भरायला हवं. प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे. त्यांना आलेली हजारो रुपयांची बिलं ते भरणार कुठून? हा प्रश्न आहे'', असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करण्याची घोषणा करुन त्यानंतर आपला शब्द फिरवून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. यावर नितीन राऊत यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
केंद्रानं पैसा दिला नसल्याचा राऊत यांचा आरोपराज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्रानं राज्याच्या हक्काचा पैसा दिलेला नाही. राज्याने सगळी तिजोरी कोरोनाकडे वळवली आहे, असं नितीन राऊत म्हणाले. वीजबिलमाफीसाठी राज्य सरकारमध्ये कुणी अडचण आणण्याचा प्रश्न नाही. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आहे, असंही ते पुढे म्हणाले.