Raj Thackeray : एवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही; राज ठाकरे यांचे मोदीवर शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:57 PM2019-03-19T19:57:23+5:302019-03-19T20:04:42+5:30
यापुढे जेवढ्या सभा, भाषणे होतील त्यात केवळ मोदी आणि भाजपलाच झोडून काढण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई : लोकसभा निवडणूक केवळ मोदी, शहा यांच्या विरोधात देश अशी होत आहे. ही निवडणूक पक्षाची नाही. भाजप पक्ष म्हणून अंतर्गत खूप त्रस्त आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजुला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या एवढा खोटारडा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नसल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची रंगशारदा सभागृहामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी यापुढे जेवढ्या सभा, भाषणे होतील त्यात केवळ मोदी आणि भाजपलाच झोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मोदींच्या भाषणांमधील वक्तव्येही सभेवेळी दाखविली. ही निवडणूक मोदी आणि शहा यांच्या विरोधात देश अशी आहे. यापुढील सभा या केवळ यांच्या विरोधात असतील. आता काय चौकीदार, भारतातल्या निवडणूका लढवताय की नेपाळच्या, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान एवढ्या खालच्या विचारांचा असेल असे वाटले नव्हते. काय तर म्हणे चौकीदार, या भानगडीत पडू नका. ही मोहीम ट्रॅप आहे. गेल्या साडे चार वर्षांतील अपयश झाकण्यासाठी हे सुरु केले आहे. सावध व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
नरेंद्र मोदींना आपण मागे काय बोललोय, पुढे काय बोलतोय याचेही भान राहिलेले नाही. शरद पवारांविरोधात बोलले होते. नंतर बारामतीत जाऊन त्याचे गुणगाण गायले. गटारात पाइप घाला, त्यातून जो गॅस येईल त्याच्यावर चहा बनवा. पंडित नेहरुंना शिव्या, इंदिरा गांधींना शिव्या घालतात. वल्लभभाई पटेलांचा पुतळा जिथे उभा केला, त्या सरदार सरोवराचं भूमिपूजन पंडित नेहरुंनी केलंय. प्रधान सेवक हा शब्द कुणाचा आहे? हा शब्द मुळात पंडित नेहरुंचा आहे. स्मृतिभवन आहे, त्यात फोटो आहे. त्यावर लिहिलय 'प्रथम सेवक समजावं'. आता काय वेळ आली, आम्ही तुम्हाला शिव्या द्यायची वेळ आली आहे. एवढा खोटा पंतप्रधान आयुष्यात पाहिला नाही, असा आरोप राज यांनी केला.
तसेच या देशाची नवी सुरुवात होणं गरजेचं आहे. मोदी-शहा ही दोन माणसं राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे. देश धोक्यात आहे. ह्यांच्या विरोधातच उतरा, विरोधात प्रचार करा, फायदा व्हायचा त्यांना होऊ दे. कार्यकर्त्यांसह मनसेच्या मतदारांनाही विनंती आहे. लोकसभेच्या नको, विधानसभेच्या तयारीला लागा. येत्या गुढीपाडव्याला जास्त बोलेन, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.
Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'
पंडित नेहरूंना, इंदिरा गांधींना शिव्या द्या ह्या पलीकडे मोदींनी गेल्या ५ वर्षात काय केलं? जर मोदींच्या मते नेहरू इतके वाईट आणि त्यांची तुलना सारखी सरदार वल्लभभाई पटेल ह्यांच्याशी करताय, मग सरदारांचा पुतळा ज्या सरदार सरोवरात उभा आहे, त्याचं भूमिपूजन पंडित नेहरूंनी केलं आहे.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 19, 2019
देशाच्या नव्या प्रारंभासाठी मोदी-शाह हे राजकीय पटलावरून बाजूला होणं गरजेचं आहे. देश ह्या दडपशाहीतुन मुक्त होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सैनिकांनो ह्या मोदी, शहांविरुद्ध प्रचार करा. #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 19, 2019
नरेंद्र मोदी स्वतःला 'प्रधान सेवक' म्हणवतात पण हा मूळ शब्द पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे, तीन मूर्ती भवनात एका तस्वीरीवर नेहरूंचं विधान लिहिलं आहे 'देशानं मला प्रथम सेवक समजावं'. #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 19, 2019