Raj Thackeray: औरंगाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल; आता राज ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:50 PM2022-05-03T16:50:57+5:302022-05-03T16:58:06+5:30
राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई/औरंगाबादमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेत १२ अटींचे उल्लंघन केल्याने सभेचे आयोजक राजीव जावळीकर आणि राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
A case registered in Aurangabad against MNS chief Raj Thackeray and organisers of a public rally where Thackeray delivered a speech on May 1st. Police registered the case after seeing the videos of his public rally.
— ANI (@ANI) May 3, 2022
(File photo) pic.twitter.com/4wa9GAPHg3
एबीपी माझाच्या वृत्तानूसार, राज ठाकरे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र गुन्हे आहेत. राज ठाकरे यांच्याविरोधात भादंवि १५३ नुसार गुन्हा दाखल असला तरी हिंसाचाराची घटना न घडल्याने त्यांना १५३ ए हे कलम लावण्यात आले नाही. या कलमानुसार दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत.
राज ठाकरे यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यास राज यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. त्याशिवाय पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला कोर्टात आव्हान देऊन हा एफआयआर रद्द करण्याची मागणी राज यांच्याकडून केली जाऊ शकते. राज यांच्याकडून आता कोणत्या पर्यायाचा अवलंब केला जातो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती.
उद्या मनसेची भूमिका काय?-
राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे रोजचा अल्टिमेटम दिलेला आहे. भोंग काढले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता उद्या मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.