Join us

"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:26 PM

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते.

मुंबई/पुणे - पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मोरे हे मनसेकडून सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या बेधडक स्टाईलमुळे ते समाज माध्यमावर प्रसिद्ध आहेत. तसेच कात्रजसह पुणे शहरात मोरेंचा दांडगा जनसंपर्क आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर वसंत मोरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच, आता परतीचे दोर कापल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही वसंत मोरेंना फोन केला होता. 

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्षातीलच काही नेत्यांचा मला विरोध होता. ते लोक वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप पाठवत होते. राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली पण त्यांची वेळ मिळाली नाही. मनसेची पुण्यातील कार्यकारिणी चुकीच्या हातात असल्याचा आरोप मोरे यांनी केला. तर, अमित ठाकरे यांच्यासोबतही १ तास याबाबत चर्चा झाली होती. मात्र, कुठलाही निर्णय न झाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं मोरेंनी म्हटलं होतं. मोरेंच्या राजीनाम्यानंतर आता ते कुठल्या पक्षात जाणार याची चर्चा होत आहे. तर, राज ठाकरेंसोबत त्यांचं बोलणं झालं की नाही, असाही प्रश्न अनेकांना पडला होता. 

राजीनाम्यानंतर मला राज ठाकरेंचाही फोन आला होता. पण, मी त्यांचा फोन घेतला नाही, असे वसंत मोरेंनी म्हटले. तर, मला अनेक राजकीय पक्षांचे फोन आले असून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही फोन केला होता, असेही त्यांनी सांगितले. तर, काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांनीही भेट घेऊन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, वसंत मोरेंचा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना भेटले होते. त्यामुळे, शरद पवार यांच्या पक्षातही त्यांना संधी असून ते तिकडे जाऊ शकतात, असेही स्थानिक जाणकारांचे मत आहे. कारण, मोरे ज्या भागातून नगरसेवक होते, त्या कात्रजचा काही भाग बारामती मतदारसंघात येतो. त्यामुळे, याचा लाभ थेट सुप्रिया सुळेंना होऊ शकतो.  

दरम्यान, पुणेकरांनी लढायलं सांगितले तर मी नक्की लढणार. शहरातील नागरिकांसाठी मी लढणार. पुणेकर जे म्हणतील तो मी निर्णय घेणार. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझा निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर करेन. मला खासदार व्हायचंय, असंही मोरे यांनी म्हटल आहे.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेपुणे