बँकांमधील आंदोलन थांबवा, आपल्याच मराठी माणसाने कच खाल्ली तर...; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:54 IST2025-04-05T13:33:08+5:302025-04-05T17:54:05+5:30
राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी बँकांमध्ये सुरु असलेले आंदोलन थांबवण्याची सूचना मनसैनिकांना दिली आहे.

बँकांमधील आंदोलन थांबवा, आपल्याच मराठी माणसाने कच खाल्ली तर...; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना पुन्हा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सर्व बँकांमध्येमराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन कामकाज मराठी होत आहे की नाही याची पाहणी केली आणि ते नसेल होत तर तसे करण्याचे निवेदन दिले. मात्र काही ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बँक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी बँकांमध्ये सुरु असलेले आंदोलन थांबवण्याची सूचना मनसैनिकांना दिली आहे.
राज ठाकरे यांनी बँकांचे कामकाज मराठीतून चालवण्याचा आग्रह केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मनसेच्या वतीने राज्यातील विविध बँकांमध्ये जाऊन आंदोलन करण्यात आली. यावेळी मनसैनिकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना देखील समोर आल्या होता. त्यानंतर महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. राज्यभरातील बँकांमधील कर्मचाऱ्यांवर मनसे कार्यकर्त्यांकडून अरेरावी होत असल्याने बँक युनियनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहीत त्यांचे अभिनंदन केले आणि हे आंदोलन थांबण्यास सांगितले आहे.
राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र
"सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्दमासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं, यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली. पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागूती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे," असं राज ठाकरेंनी म्हटलं.
"रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्यावरचं लक्ष हटू देऊ नका। सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील!," असंही राज ठाकरे म्हणाले.