Raj Thackeray : 'एकदाच्या विधानसभा निवडणुका घ्या अन्...', राज्यातल्या परिस्थितीवर राज ठाकरेंची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:29 PM2023-03-22T21:29:10+5:302023-03-22T21:29:51+5:30
'महाराष्ट्रातील मतदार तुमच्या तोंडात चिखल घातल्याशिवाय राहणार नाही.'
मुंबई: गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी उद्धव ठाकरेंसह एकनात शिंदे आणि भाजपवरही टीका केली. यावेली त्यांनी राज्यातल्या राजकारणावर भाष्य करताना विधानसभा निवडणुका घेण्यास सांगितले.
संबंधित बातमी- 'अलीबाबा आणि त्यांचे चाळीस यांनाच कंटाळून गेले', उद्धव ठाकरेंवर टीका; एकनाथ शिंदेंना सल्ला
यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली आणि नंतर वेगळे झाले. महाराष्ट्रातल्या मतदारांनी आता विचार करण्याची गरज आहे. तुम्ही मतदान करणार आणि हे यांचा खेळ करत बसणार. 2019 ची निवडणूक झआली आणि त्यानंतर उद्ध ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली. अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली. चार भिंतींमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले. मग खुल्या स्टेजवर तुम्ही काहीच का बोलला नाहीत? तुम्हाला समजलं की, आमच्याशिवाय यांना सरकार स्थापन करता येणार नाही, त्यानंतर तुम्ही अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्याची अट घातली.'
कोर्टावर अवलंबून राहणारे सरकार...
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली. 'ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले,आज त्याच महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. आज राज्यात नवीन उद्योग येत नाहीत. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी, महिला, विद्यार्थी सरकारकडे पाहत आहेत आणि सरकार कोर्टाकडे पाहत आहे. असे कोर्टावर अवलंबून असलेले सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. मला वाटतं सगळ्यांनी ठरवावं आणि एकदाची विधानसभा निवडणुका घ्याव्यात. जो काही सोक्षमोक्ष व्हायचा, तो होऊन जाऊदे. तुम्ही जो चिखल केलाय, तोच चिखल राज्यतला मतदार तुमच्या तोंडात घालेल,' असंही राज ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंना सल्ला
ते पुढे म्हणाले, 'मला एकनाथ शिंदेंना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेत आहेत, तुम्ही तिकडे जाऊन सभा करत बसू नका. हे तुम्हाला गुंतवून ठेवतील. राज्याचे काय? राज्याचे किती प्रश्न प्रलंबित आहेत. आज पेन्शनचा विषय आहे, शेतकऱ्यांच्या विम्याचा विषय आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. त्यांना भेटा आणि मिटवा हे प्रश्न एकदाचे,' असेही ते यावेळी म्हणाले.