मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या आई कुंदा ठाकरे व बहीण जयवंती देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज आणि बहिणीवर सायंकाळी लीलावती रुग्णालयात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. ते निवासस्थानी गृह विलगीकरणात आहेत. (Raj Thackeray, His Mother And Sister Tested Positive For COVID-19, Admitted To Hospital In Mumbai)
कुंदा ठाकरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेऊन त्या घरी आल्या. राज व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चाचणी केली होती. त्याशिवाय, त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेसही लागण झाली आहे. राज ठाकरे यांना थोडा ताप आहे. कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे त्यांच्यात नाहीत. त्यांनी व कुंदा ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही त्यांना लागण झाली.
राज व जयवंती यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलिल पारकर यांनी सांगितले की, दोघांनाही मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल दिले असून त्यांना गृहविलगीकरणात काही दिवस राहावे लागेल. त्यांच्या आईलाही अँटिबॉडी कॉकटेल देण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. ते लवकर बरे होतील.
मास्कशी ३६चा आकडा- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून राज ठाकरे मास्क घालत नाहीत. - त्या बद्दल त्यांना पत्रकारांनी आधीही विचारले असता त्यांनी मिश्किल उत्तरे दिली होती.