मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेले काही दिवस जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंनी मिश्कील टिपण्णी केल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंनी नातवाल धरुन एक पंच मारला. दीपोत्सव सोहळ्यातील सजावट आणि कार्यक्रमाची वाढती रुपरेषा पाहून एकाने प्रश्न विचारला, असे म्हणत राज ठाकरेंनी मिश्कील उत्तर दिले. त्यावेळी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही हसायला लागले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. मात्र, या कार्यक्रमाचा कोणाताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या सोहळ्यातील तीन दिग्गज नेत्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राज ठाकरे यांच्या हातात दिसलेला त्यांच्या नातवाचीही आता चर्चा होत आहे. कदाचित, त्यामुळेच राज ठाकरेंनी नातवाला धरुन पंच मारला.
सध्याचं हे दीपोत्सवाचं 10 वं वर्ष आहे. दरवर्षी आपण असंच दीपोत्सव साजरा करतो. यंदा हे जरा जास्त आहे. अनेकांनी मला विचारलं, हे नातू झाल्यामुळं का?. मग मी उत्तर दिलं. आपण दरवर्षी हे वाढवत जाऊ... नातू नाही दिवे... असे राज यांनी म्हटले. त्यावेळी, बाजुलाच उभे असलेल्या मुख्यमंत्र्यांना हसून दाद दिली, तर उपमुख्यमंत्रीही हसायला लागले. या वक्तव्यानंतर समोर उपस्थितांच्याही चेहऱ्यावर हास्य पहायला मिळालं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी नातवावरुन एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यामुळे, सध्या नातू हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत.
दरम्यान, शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे देखील हजर होत्या. अमित ठाकरे, मिताली ठाकरे यांच्यासह नातू कियान देखील उपस्थित होता. चिमुकल्या कियानने पहिल्यांदाच आजोबांनी आयोजित केलेल्या मंचावर हजेरी लावली होती. राज ठाकरे यांनी यावेळी आवर्जुन उपस्थिती लावल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले.