मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कंबरेजवळचा स्नायू दुखावला गेल्याने राज यांच्यावर शनिवारी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती डॉ. जलील परकार यांनी दिली.
राज ठाकरेंना सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली. ठाकरे यांच्या हाताला ११ जानेवारी २०२१ रोजी फॅक्चर झाले होते. टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाली होती. ज्यात त्यांच्या हातासोबतच पायालाही दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना बसण्याचा त्रास जाणवत होता. तसेच प्रवास करतानाही त्यांना अधिक त्रास जाणवू लागला होता. १० एप्रिल रोजी दुपारी त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ. आनंद उत्तुरे यांनी शस्त्रक्रिया केली आणि डॉ. जलील पारकर शस्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.