मुंबई - राज्याच्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. शिंदे आणि समर्थक ४७ आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? असा संघर्ष एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झाला आहे.
राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते सध्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर दुसरीकडे मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे मनविसेचं पुनर्बांधणी संपर्क अभियान राबवून मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील दोन आठवड्यात अमित ठाकरेंनी ३५ विधानसभा मतदारसंघात मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या अंतर्गत सुमारे ७००० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. मविआ नेते आणि भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावेळी राज ठाकरे हे त्यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे गेले काही दिवस रुग्णालयात आहेत.
वडील रुग्णालयात असतानाही मनसे नेते अमित ठाकरे हे मात्र अत्यंत शांतपणे त्यांची राजकीय वाटचाल करत आहेत. दररोज किमान दोन विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयात मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानाच्या अंतर्गत ते महाविद्यालयीन तरुण तरुणींना भेटत आहेत. ९ जून रोजी सुरू झालेल्या मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियानातंर्गत २३ जूनपर्यंत अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३५ विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली. आजवर एकूण सुमारे सात हजारहून अधिक विद्यार्थ्यांशी वैयक्तिक किंवा गटागटाने संवाद साधला आहे. मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धार अमित ठाकरे यांनी केला असून संपर्क अभियानात हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दिवसा मनविसे पुनर्बांधणी, रात्री रुग्णालयात बाबांची काळजीअमित ठाकरे यांच्या या संपर्क अभियानाचा मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत निश्चितच खूप मोठा फायदा होणार असल्याची भावना मनसे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. संपर्क अभियान बैठका झाल्यानंतर रात्री कितीही उशीर झाला तरी अमित ठाकरे दररोज रात्री बाबा राज ठाकरेंची तब्येत विचारपूस करायला आणि त्यांना काय हवं नको ते बघायला रात्री उशिरापर्यंत लीलावती रुग्णालयात थांबतात.