मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) मुंबईतील चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलायचे उद्धाटन झाले. त्यानंतर बोलताना राज ठाकरे यांनी मनसे शिवजयंती तिथीने साजरा करणारा पक्ष आहे, असे सांगितले. तसेच, तिथीने शिवजयंती साजरी करण्यामागचे संदर्भासहीत स्पष्टीकरणही दिले. यावेळी, भाषण झाल्यानंतर राज ठाकरेंनी व्यासपीठासमोर काढण्यात आलेल्या रांगोळीचे कौतुक केले. ही रांगोळी कुणी काढली अशी विचारणाही केली.
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मी येथे भाषणाला उभा नसून तुमचं सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आल्याचे सांगितले. 'मी काही हारतुरे घ्यायला आलेलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा शिवजयंती तिथीने साजरी करतो, याचा अर्थ आज साजरी करायची नाही असा नव्हे,'' असे म्हणत राज यांनी तिथीनुसारच्या शिवजयंतीचं कारणही सांगितलं. आपल्या भाषणानंतर त्यांनी समोरील रांगोळी कलाकृतीचं कौतुक केलं. ही रांगोळी कुणी काढली अशी विचारणा केली. त्यावेळी, उपस्थितांनी त्या कलाकार युवकाचं नाव घेतलं. युवक निलेश लगेचच व्यासपीठावर आला. त्यावेळी, राज यांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मात्र, ही एकमेव कला आहे, जी मला आवडत नाही, असेही म्हटले.
रांगोळी ही एकमेव कला अशी आहे, जी कला काढल्यानंतर पुन्हा पुसली जाते. हा कार्यक्रम संपल्यानंतर रांगोळी पुसली जाणार, कलाकाराने कष्टाने ही कला सादर केलेली असते. पण, ती पुसली जाते. त्यामुळे, मला ही कला आवडत नाही, असे राज यांनी त्या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराला म्हटले. त्यानंतर, सर्वांना अभिवादन करुन ते निघून गेले.
म्हणून तिथीनुसार शिवजयंती “आमच्या छत्रपतींचा जयजयकार, आमच्या छत्रपतींची जयंती मला असं वाटतं ३६५ दिवस आपण साजरी करावी. पण आजही साजरी केली तरी काही हरकत नाही आणि तिथीनेही साजरी केली तरी काही हरकत नाही. पण तिथीने का? आणि याचं एकमेव कारण, आपल्याकडे जेवेढे सण येतात दिवाळी, गणेशोत्सव इत्यादी जेवढे काही सण येतात ते सर्व सण आपण तिथीने साजरे करतो. आपण तारखेने साजरे नाही करत. मागील वर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती, ती या वर्षी त्याच तारखेला असेल? नसतेच. मागील वर्षी गणेशोत्सव ज्या तारखेला होता तो यंदाही त्याच तारखेला नसेल, कारण ते तिथीने येतात. जन्मदिवस, वाढदिवस हे आपले. महापुरुषांचा आणि तोही छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो सण आपण तो तिथीने साजरा करायचा. याचा अर्थ आज साजरा करायचा, असा होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी तिथीने साजरा करायचा त्यावेळी यापेक्षाही जास्त जल्लोषात शिवजयंती साजरी तुमच्याकडून झाली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.
शाखा हे दुकान नव्हे
“लोकांना विश्वास वाटला पाहिजे की या शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळेल. ही शाखा आहे दुकान नव्हे. त्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही राखलं पाहिजे. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करतो. आजच्या शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.” असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना उद्देशून म्हटलं.