Raj Thackeray : 'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 09:00 PM2023-03-22T21:00:32+5:302023-03-22T21:16:38+5:30
'काहीजण बोलले होते की, मनसे संपलेला पक्ष आहे. आज त्यांचीच काय अवस्था झाली.'
मुंबई: आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्याचे कारणही सांगितले.
शिवसेनेची परिस्थिती पाहून...
यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'काहीजण बोलले होते की, मनसे संपलेला पक्ष आहे. आज त्यांचीच काय अवस्था झालीये....गेल्या काही काळातील राजकीय स्थिती पाहता, राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे जाणवत आहे. हे सगळं राजकारण पाहताना मला वाईट वाटतं. शिवसेना आणि धनुष्यबाण तुझं का माझं, माझं का तुझं सुरू आहे. हे सगळं पाहून फार वेदना होत आहेत. लहानपणापासून तो पक्ष पाहत आलो, तो पक्ष जगलो. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन, घाम गाळून स्वतःच्या रक्तातून उभी केलेली संघटना आहे. आज हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर वाईट वाटतं,' असं राज ठाकरे म्हणाले.
संबंधित बातमी- 'अलीबाबा आणि त्यांचे चाळीस यांनाच कंटाळून गेले', उद्धव ठाकरेंवर टीका; एकनाथ शिंदेंना सल्ला
शिवसेनेतून बाहेर पडलो, कारण...
यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, 'मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा इथेच बोललो होतो. माझा वाद विठ्ठलाशी नाही, त्याच्या आजुबाजुच्या भडव्यांशी आहे. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार आणि त्याचा वाटेकरी मला व्हायचे नाही. 2006 साली मी याच शिवतीर्थावर पक्ष स्थापन केला.'
कधीही विचार नाही केला
'मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, बाळासाहेबांसमोर पक्ष स्तापन करण्याचा कधी विचारही केला नव्हता. मला शिवसेनाप्रमुख-मुख्यमंत्री बनायचे आहे, अशा अफवा पसरवल्या गेल्या. पण ते सगळं साफ खोटं आहे. माझ्या स्वप्नातही कधी तसा विचार आला नाही. शिवसेनेचे शिवधनुष्य बाळासाहेबांशिवाय कोणालाही झेपणार नव्हतं. एकाला झेपला नाही आता दुसऱ्याला झेपेल की नाही, माहित नाही,' असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.