मुंबई-
उद्धव ठाकरेंसोबत आता मतभेद उरले नाहीत आता तर मनभेद झालेत. त्यामुळे पुन्हा एकत्र येणं नाही असं स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख छोट्या मनाचा माणूस असा केला आणि राज ठाकरेंबाबत बोलताना त्यांची स्तुती केली.
"राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे. ते किंचित मनाचे नाहीत. राजकारणात आमची युती होईल की नाही माहित नाही. पण ते वैयक्तिक पातळीवर खूप चांगले मित्र आहेत आणि राहतील. आमची भेट झाली की राजकारणावर जास्त बोलतही नाही. ते मोठ्या मनाचे आहेत. तर उद्धव ठाकरे किंचित मनाचे आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा मोठा फरक आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला अन्..."राजकारणात विश्वासघातकी माणसाला कधीच सोबत घ्यायचं असतं. कारण तुम्ही पुन्हा संधी दिली आणि तुमच्यासोबत पुन्हा विश्वासघात झाला तर ती पक्षासाठी मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येणं सध्यातरी शक्य नाही. तसंही उद्धव ठाकरे यांनीच आमच्यासाठीचे दरवाजे बंद केले होते. त्यांनीच दरवाजा बंद केला आणि कुलूपही त्यांनीच लावलंय", असं बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना अतिमहत्वाकांक्षा नडलीशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं. पण उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाले आणि मुलाला मंत्री केलं. उद्धव ठाकरेंना त्यांचीच अतिमहत्वाकांक्षी नडली आहे. ते आजही रोज चूक करताहेत आणि ते आजही सुधारत नाहीयत. त्यांना लालखूर्ची पाहिजे. अजूनही ते मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत, असाही हल्लाबोल बावनकुळे यांनी केला.