Join us

Raj Thackeray : 'मी 'मनसे'चा अध्यक्ष राहणार, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार नाही'; राज ठाकरेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 8:32 PM

Raj Thackeray : काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, यानंतर ठाकरे भाजपासोबत युतीत सहभागी होणार असून शिंदे गटाचेही प्रमुख होणार अशा चर्चा सुरू होत्या.

Raj Thackeray ( Marathi News ) : मंबई-आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, यानंतर ठाकरे भाजपासोबत युतीत सहभागी होणार असून शिंदे गटाचेही प्रमुख होणार अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आज राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. 

"अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही. काय तर म्हणे राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार, "अरे व्हायचं असतं तर २००६ सालीच झालो नसतो का? तेव्हा खासदार-आमदार माझ्या घरी आले होते. पण मी पक्ष फोडून राजकारण करणाऱ्यातला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

"तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना'तेच मी वाढवणार.मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असं सांगत राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना ठाकरे यांनी पूर्णविराम दिला. 

राज ठाकरे म्हणाले, माझ्या चिन्हाच्या बाबतीतही अफवा. 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार. कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवून नका, असंही राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेलोकसभा निवडणूक २०२४