ज्येष्ठ नागरिक महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्याला तात्काळ अटक करा; राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:54 PM2022-09-01T21:54:31+5:302022-09-01T21:55:14+5:30
गणपती मंडपावरून मनसे पदाधिकाऱ्याने केली ती कृती
मुंबई: शहरातील मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन झालेल्या वादात एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर एका पक्षाच्या कार्यकर्त्याने हात उचलल्याची घटना घडली. भररस्त्यात सर्व लोकांसमोर एका कार्यकर्त्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण केल्याची घटना धक्कादायक आणि अतिशय घृणास्पद घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यात एक व्यक्ती महिलेला सर्वांसमोर कानाखाली चपराक मारताना आणि आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत आहे. त्या माणसाने त्या महिलेला धक्काबुक्की केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेला मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा स्थानिक पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यकर्त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्या मनसे पदाधिकार्याला तात्काळ अटक करावे आणि मनसेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. "मुंबादेवी येथे गणपती डेकोरेशनचा मंडप रस्त्यात टाकणार्या मनसे पदाधिकार्याला अटकाव केला. त्यानंतर चिडलेल्या मनसे पदाधिकार्याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या कानशिलात लगावली ही पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे. ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्या मनसे पदाधिकार्याला तात्काळ अटक करावी. महत्त्वाची बाब म्हणजे या घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी", अशी मागणी करत राष्ट्रवादीने या कार्यकर्त्यावर टीकास्त्र सोडले आहे.
नक्की काय, कधी घडलं?
#WATCH | A video went viral showing a man hitting & pushing a woman in Kamathipura, Mumbai on Aug 28, allegedly over installing a bamboo stick (for an ad) in front of woman's shop without consent. A non-cognizable offence lodged at Nagpada PS:Mumbai Police
— ANI (@ANI) September 1, 2022
(Note:Strong language) pic.twitter.com/9PinhzGuyj
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ ऑगस्टला घडला. गणपतीच्या मंडपाचा खांब उभारण्यावरुन वाद झाला. यावेळी एका व्यक्तीने सर्वांसमोर महिलेला मारहाण केली. विनोद अरगिले असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो मनसेचा विभाग प्रमुख असून, पोलिसांनी त्याच्यासह राजू अरगिले, सतीश लाढ यांना ताब्यात घेतले आहे. मुंबादेवी परिसरात मनसेचे कार्यकर्ते मंडपाचा खांब उभारत होते. यावेळी प्रकाश देवी नावाच्या महिलेने त्यांना तिच्या औषध दुकानासमोर खांब न लावण्यास सांगितले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. ८० सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिलेला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकही स्थानिक हस्तक्षेप करत नसल्याचे दिसून आले.