Join us  

Raj Thackeray, MNS: महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याची पदावरून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 8:33 PM

महिलांचा व जेष्ठांचा आदर राखला गेलाच पाहिजे, असा मनसेने ट्वीटरवरून दिला संदेश

Raj Thackeray, MNS: शहरातील कामाठीपूरा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन झालेल्या वादात एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर एका पक्षाच्या कार्यकर्त्याने हात उचलल्याची घटना घडली. भररस्त्यात सर्व लोकांसमोर एका कार्यकर्त्याने ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण केल्याची घटना धक्कादायक आणि अतिशय घृणास्पद घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यात एक व्यक्ती महिलेला सर्वांसमोर कानाखाली चपराक मारताना आणि आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसत आहे. त्या माणसाने त्या महिलेला धक्काबुक्की केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिलेला मारहाण करणारा व्यक्ती मनसेचा स्थानिक पदाधिकारी होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेकडून त्या पदाधिकाऱ्यावर पदावरून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

कामाठीपूरा या परिसरात घडलेली घटना पाहून मनः विषन्न झाले. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुध्दा दिला असतांना सदर घडलेल्या घटने बाबत पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणुन कामाठीपूरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती घेवून व सखोल चौकशी करून यांग्य तो निर्णय घेण्यात येईल. महिलांचा व जेष्ठांचा आदर सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, असे पत्र ट्विटरवर पोस्ट करत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नक्की काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद गणपतीच्या मंडपाचा खांब उभारण्यावरुन वाद झाला. यावेळी एका व्यक्तीने सर्वांसमोर महिलेला मारहाण केली. विनोद अरगिले असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो मनसेचा विभाग प्रमुख असून, पोलिसांनी त्याच्यासह राजू अरगिले, सतीश लाढ यांना ताब्यात घेतले आहे. या परिसरात मनसेचे कार्यकर्ते मंडपाचा खांब उभारत होते. यावेळी प्रकाश देवी नावाच्या महिलेने त्यांना तिच्या औषध दुकानासमोर खांब न लावण्यास सांगितले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. ८० सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिलेला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकही स्थानिक हस्तक्षेप करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या पदाधिकाऱ्यावर मनसे काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते.

टॅग्स :मनसेराज ठाकरेसोशल मीडिया