Aditya Thackeray Trolled: एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला धक्का बसला आणि महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त झाले. आता ठाकरे कुटुंब पक्षबांधणी करण्याच्या व पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेना माझी आहे आणि मी शिवसैनिकांचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना म्हटले होते. तसेच एकनाथ शिंदे गटाला सत्तेचा आशीर्वाद मिळावा, पण माझ्याकडे माझी शिवसेना आहे, असेही ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर १४ जुलैपासून आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ सुरू केली असून त्या अंतर्गत विविध जिल्ह्यात ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. पण असे असले तरी काही ठिकाणी शिवसैनिक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. त्यानंतर मनसेनेआदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्याचे दिसून आले.
आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा मुंबईतून सुरू झाली. त्यानंतर गेल्या २-३ दिवसांत मीरा-भायंदर महापालिकेचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे नवाब असा करत त्यांची खिल्ली उडवली. "छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रे'चे तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले... आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय... #शिल्लकसेना", असे ट्वीट करत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले.
दरम्यान, सद्यस्थितीत पक्षातील पकड मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. खरे तर एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपापल्या भागात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संवर्गातील ही साशंक स्थिती दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी केली असून निष्ठा यात्रा सुरू झाली आहे. या भेटीत ते एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही जाणार आहेत. निष्ठा यात्रेमुळे कार्यकर्त्यांशी भेटीगाठी होणार आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही या भेटी महत्त्वाच्या आहेत.