Raj Thackeray: वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची; पाटलांचा घणाघाती पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:38 AM2022-04-13T07:38:48+5:302022-04-13T07:42:04+5:30
जयंत पाटील गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे
मुंबई/ठाणे - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या मनसेच्या उत्तर सभेत शरद पवारांपासून ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख त्यांनी केला. तसेच, जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात, असा टोलाही लगावला. राज यांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. ''वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत'', असे म्हणत पलटवारही केला.
जयंत पाटील गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे. तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. हे नेहमी आश्चर्यचकीत असतात, यांना काहीच माहिती नसतं.", असे म्हणत राज यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला होता. त्यानंतर, पाटील यांनी ट्विट करुन राज यांच्यावर पलटवार केला. राज यांना वारसा प्रबोधनकारांचा पण विचारसरणी नथुराम गोडसेंची असल्याची घणाघाती टिका पाटील यांनी केली आहे.
२०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर,
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 12, 2022
वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची,
पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी.
वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत.
राज ठाकरेंनी २०१४ ला मोदींना पाठींबा दिला, २०१९ ला मोदींना विरोध केला. आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर घेतली आहे. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची. तर, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी असल्याची घणाघाती टीका पाटील यांनी केली आहे. तसेच, वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
जयंत पाटलांना काय म्हणाले राज ठाकरे
"मी जेव्हा उघडपणे बोलत होतो, तेव्हा हे काही बोलले नाहीत आणि आता जंत पाटील म्हणतात, राज ठाकरे उत्तर प्रदेशात कधी गेले होते. उत्तर प्रदेशचे यांना काय कौतुक? जंत पाटील माझे भाषण नीट ऐकत जा. मी म्हटलं होतं, ज्या बातम्या कानावर येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर त्याचा मला आनंद आहे. मी जर तर बोलोलो होतो", असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, "तुम्हाला आठवत असेल तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी सांगत होतो. मोदी पंतप्रधान होतील तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्यावं. त्या तीन राज्यांचा विकास करावा, त्या राज्यातील माणसे महाराष्ट्रातात येतात. त्या माणसांचे ओझे महाराष्ट्र सहन करू शकत नाहीत."
"जंत पाटील नेहमी चकीतचंदू"
यावेली राज ठाकरेंनी जयंत पाटलांची मिमिक्रीदेखील केली. "जंत पाटलांना काहीही सांगा ते नेहमी चकीतचंदू असतात. गृहमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं, एकदा बेहराम पाड्यात जाऊन बघा, भीषण अवस्था आहे. तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. हे नेहमी आश्चर्यचकीत असतात, यांना काहीच माहिती नसतं."
"आम्ही समोरच्या पक्षाला विझवतो"
ते पुढे म्हणाले, "हे म्हणतात, संपलेल्या-विझलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार. येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का? जंतराव हा विझलेला पक्ष नाही, समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. यांच्या मतदारसंघाबाहेर यांना कोणी विचारत नाही. त्या सुप्रिया सुळेंनी तर काहीच बोलायची गरज नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत," असा घणाघात त्यांनी यावेळी केला.