Join us  

Raj Thackeray: संदीप देशपांडे अतिरेकी आहेत की रझाकार? शोध घेणाऱ्या पोलिसांना राज ठाकरेंचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 5:47 PM

Raj Thackeray Letter to Uddhav Thackeray: संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेत असताना ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते. दरम्यान, तेव्हापासून पोलिसांकडून संदीप देशपांडेंचा शोध सुरू आहे. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. दरम्यान, संदीप देशपांडेंविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई - मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक होणाऱ्या मनसे आणि मनसैनिकांविरोधात पोलिसांनी सक्त कारवाईची भूमिका घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावरील बैठक आटोपून जात असलेल्या संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेत असताना ते पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते. दरम्यान, तेव्हापासून पोलिसांकडून संदीप देशपांडेंचा शोध सुरू आहे. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. दरम्यान, संदीप देशपांडेंविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, आमचे संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातील रझाकार आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी, कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले आहेत, हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडतो की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकार आणि पोलिसांनी कधी राबवली आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक विचार मांडले, ते म्हणाले की, सर्व देशबांधवांना मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन, अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यांमधील उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन करण्यापूर्वीच त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार मनसैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडिपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :राज ठाकरेसंदीप देशपांडेमनसेपोलिस