पाकिस्तान आणि तेथील हिंदूंबाबत राज ठाकरेंनी केले मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 06:07 PM2020-02-09T18:07:09+5:302020-02-09T18:07:53+5:30
पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबत राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
मुंबई - मनसेच्या आज झालेल्या महामोर्चानंतर झालेल्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच पाकिस्तान आणि तिथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांबाबतही राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा बनला आहे. तसेच, पाकिस्तानात अत्याचार होत असलेल्या हिंदू अल्पसंख्याकांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. अमेरिकेत 9/11 ला जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, शेकडो जण मारले गेले. या स्फोटामागे कोण होतं? मुंबईत 1993 साली बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या दाऊद इब्राहीमला पाकिस्तानाने थारा दिला आहे.''
''पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यांना हिंदुस्थानात नाही घ्यायचं? तर काय करायचं. इतर देशात धार्मिक अत्याचार होत असतील तर भारत नागरिकत्व देईल. १९५५ सालचा हा कायदा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला. १९५५ सालची परिस्थिती वेगळी होती. आज २०२० सालची परिस्थिती वेगळी आहे. पण काही निर्णय हे आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करून घ्यावे लागतात. हिंदूना घेताय मग मुस्लिमांनाही घ्या, असे सांगितले जात आहे. पण त्यांना का घ्यायचं? माझा देश धर्मशाळा आहे का? कोणीही कुठेही यावं, राहावं, बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. माणुसकीचा ठेका प्रत्येकवेळी भारताने घेतला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, सीएए आणि एनआरसीबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केले. अनेकांना सीएए आणि एनआरसीबाबत माहितीही नाही. सीएए, एनआरसीवर कायद्याची माहिती नसणारेही टीका करताहेत. व्हॉट्सअपवर मेसेज पसरवले जातात. या कायद्यांबाबत मी माहिती घेतली. जे जन्मापासून इथे राहतायेत त्यांना थोडी बाहेर काढणार आहेत? जे कायद्यात नव्हतेच तर मग कोणासाठी ही ताकद दाखवली? घुसखोरांना हाकललेच पाहिजे त्यात तडजोड होऊच शकत नाही.'' असे ते म्हणाले.